राज्य सरकारकडून “किल्ल्यांचे गाव ” दर्जा मिळवून देणार
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अंबवडे गाव पुनर्जीवित करीत आहे. येथील एकेक किल्ला पाहताना आपण प्रत्यक्ष त्या किल्ल्यावर आहोत की काय, अशी भावना निर्माण होत आहे. जसे पुस्तकाचे गाव म्हटलं की भिलार आठवतं तसं आता किल्ल्यांचे गाव म्हटलं की परळी खोऱ्यातील अंबवडे हे गाव डोळ्यासमोर येतं. गावाने शिवरायांचा ऐतिहासिक ठेवा जतन केला असून या गावाला राज्य शासनाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अंबवडे ता. सातारा येथे ऐतिहासिक गड- किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, भिकूभाऊ भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश सावंत, किसन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,अंबवडे गावची ओळख ही आता राज्यात नव्हे तर देशात निर्माण झाली पाहिजे. येथे तयार करण्यात आलेले गड, किल्ले पाहण्यासाठी देशभरातून शिवभक्त आले पाहिजेत, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन गड किल्ले सांभाळले. त्यांचा अजरामर इतिहास, तसेच गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने येथील बाल मावळे हा उपक्रम राबवत आहेत. या सर्वांचे मी मनापासून कौतुक करतो. राजू भोसले यांनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे व सर्व मावळ्यांना बक्षीसे दिली आहेत. ही फक्त बक्षीसं नसून तुमच्यासाठी शाब्बासकीची थाप आहे, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आयोजकांचे व मावळ्यांचे कौतुक केले.
यावेळी हरीश पाटणे, राजू भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात अंबवडे, भोंदवडे, परळी तसेच आजूबाजूच्या गावातील आकर्षक गड किल्ल्यांना लाखों रुपयांची बक्षिसे वितरीत करण्यात आली. कार्यक्रमास परळी पंचक्रोशीतील विविध गावचे पदाधिकारी, मान्यवर आणि बाल मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान…
अंबवडे बुद्रुक या ठिकाणी एक ते दोन गुंठ्यामध्ये भव्य गड किल्ले बनवले जातात. हे गडकिल्ले तयार करण्यासाठी अख्ख कुटुंब व्यस्त असतं. त्यांच्या या मेहनतीसाठी राजू भोसले मित्र समूहाने लाखो रुपयांची बक्षिसे देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यामुळे गड किल्ले बनवणाऱ्या मावळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.
You must be logged in to post a comment.