मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रशासनाला निर्देश

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : गडकर आळी परिसरातील श्री पेढ्याचा भैरोबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील सुमारे १२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रस्त्यासह वॉकिंग ट्रॅकच्या निकृष्ट दर्जाबाबत ‘भूमिशिल्प’ मध्ये ‘पेढ्याच्या भैरोबा मंदिर मार्गावरील रस्त्याची परवड..’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दखल घेत संबंधित कामाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सातारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
सदर रस्त्यावर डांबराचा थर नसून सैल खडी टाकण्यात आल्याने तो धोकादायक बनला आहे. रविवारी दिनांक ६ एप्रिल रोजी यात्रेदरम्यान अनेक भाविक घसरल्याच्या घटना घडल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर ‘भूमिशिल्प’ ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत तातडीच्या कारवाईचे निर्देश दिले.
निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदाराकडूनच त्याच्या खर्चातून रस्त्याचे पुनर्बांधकाम करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सार्वजनिक कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
You must be logged in to post a comment.