महायुतीकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने “रयत क्रांती” नाराज

सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी साताऱ्यात बैठक; धुसफूस चव्हाट्यावर

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत महायुतीकडून दूजाभाव करीत सापत्न वागणूक मिळत असल्याने आ.सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची निर्णायक बैठक सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे.

याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकातील माहितीनुसार, भाजप प्रणित महायुतीमध्ये रयत क्रांती संघटनाही सहभागी आहे. मात्र सातारा जिल्ह्यात महायुतीमध्ये रयत क्रांती संघटनेला कोणतेही जबाबदारीचे स्थान दिले जात नाही. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांचा फोटोदेखील कोणत्याही बॅनरवर नाही. भारत आणि सातारा जिल्हा कृषी प्रधान आहे. राज्यातील समस्त बळीराजाचे नेतृत्व रयत क्रांती संघटनेचे नेतृत्व आ.सदाभाऊ खोत करीत आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात महायुतीने आ.सदाभाऊ खोत यांच्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रयत क्रांती संघटनेला विचारात घेतले नाही. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी रयत क्रांती संघटनेने सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सोमवार, दि.१८ रोजी सकाळी साडेदहा वाजता हॉटेल लेक व्ह्यू याठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक आयोजित केलेली आहे.त्यानंतर १२ वाजता पत्रकार परिषद होऊन निवडणुकीसंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

आ.सदाभाऊ यांची रयत क्रांती संघटना सातारा जिल्ह्यात सोमवारच्या बैठकीत नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रयत क्रांती संघटनेच्या या प्रसिद्धीपत्रकाच्या निमित्ताने ‘सारे काही अलबेल आहे’, असे दर्शवणाऱ्या महायुतीतील घटक पक्ष, संघटनांमधील धुसपुस चव्हाट्यावर येऊ लागली आहे.

error: Content is protected !!