आनेवाडी टोल नाका उदयनराजे समर्थकांकडून निसटला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे – बेंगलोर महामार्गावरील आनेवाडी टोलनाका हा नेहमी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चिला जात होता. हा टोलनाका आपल्या ताब्यात असावा, यासाठी तीन वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये राडा झाला होता. मात्र, आज या टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे . ३ एप्रिल पासून या टोल नाक्याची जवाबदारी पुण्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांना देण्यात आली आहे.

आनेवाडी टोल नाक्याच्या टोल वसुलीवरून सातत्याने होणारा राडा, फास्टॅगच्या तांत्रिक अडचणी, रिलायन्स इन्फ्राच्या सदोष सुविधा यामुळे आनेवाडी टोलनाका सातत्याने चर्चेत असतो . तीन वर्षापूर्वी आनेवाडी टोल नाक्याच्या ताबा घेण्यावरून दोन्ही राजे समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता . मात्र अशोका स्थापत्य ने या टोलनाक्यांवर नियंत्रण ठेवले होते . आनेवाडी टोलनाका हस्तांतरणाची बरेच दिवसापासून चर्चा सुरू होती . आनेवाडी टोलनाका राष्ट्रवादीचे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन दोडके व खेड शिवापूर टोलनाका व्यवस्थापन शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांना देण्यात आले आहे . या नवीन व्यवस्थापनाचा अंमल तीन एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे . टोलनाका हस्तांतरणाचे राजकीय संदर्भ लावले जात आहेत .

या हस्तांतरणामुळे उदयनराजे भोसले यांना राजकीय धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. व्यवस्थापन हस्तांतराच्या खबरदारीचा उपाय म्हणून गुरूवारी आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता . उदयनराजे समर्थक अशोक सावंत यांच्या अशोका स्थापत्य कंपनीकडे खेड शिवापूर व आनेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन देण्यात आले होते . येत्या तीन दिवसात व्यवस्थापन हस्तांतरण होणार असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार यांच्या आदेशाप्रमाणे मोठया प्रमाणावर कुमक वाढविण्यात आल्याने आनेवाडी टोल नाक्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते .

error: Content is protected !!