सातारा, (भूमिशिल्प, वृत्तसेवा) : रत्नागिरीमध्ये हत्ती किंवा सिल प्राण्याच्या दाताची तस्करी करण्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी हातखंबा येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले .स्थानिक गुन्हे शाखा रत्नागिरी व सातारा वन विभागाने ही संयुक्त कारवाई केली. यामध्ये वाहन आणि दात जप्त केले आहे. नेमका दात कोणाचा आहे, याची खात्री करण्यासाठी प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली जाणार आहे.
मुहम्मद नुमान यासीन नाईक(वय 41.रा कोनाडी -उत्तर गोवा ), हेमंत सुरेश कांडर (वय 38 बावशी), राजन दयाळ पांगे(वय 58,रा.पारवाडी,मालवण सिंधुदुर्ग ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती सातारा व रत्नागिरी वन विभाग आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली. त्यांनी संयुक्त मोहीम आखून रात्री नऊ वाजता हातखंबा येथे सापळा रचला. रात्री संशयित गाडी आल्यानंतर त्या गाडीची झडती घेण्यात आली. तेव्हा संशयिताकडून प्राण्यांचा दात हस्तगत करण्यात आला. मात्र हा हस्तीदंत आहे की सिल प्राण्याचा दात, हे अजून स्पष्ट झालेले नाही .
ही कारवाई कोल्हापूरचे मुख्य वनरक्षक व्ही.क्लेमेंट बेन, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, रत्नागिरी विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, वनसंरक्षक सचिन निलख, गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनक्षेत्रपाल फिरते पथक (चीपळूण) राजेंद्र पाटील, साताऱ्याचे पथकातील सचिन डोंबाळे, लांजा वनपाल दिली आरेकर, पालीचे गौतम कांबळे, सागर पताडे ,संजय रणधीर ,आकाश कडूक ,राहुल गुंठे, राजाराम पाटील आदींनी ही कारवाई केली.