अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील यांची माहिती
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे १ लाख मराठा उद्योजकांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज दिले आहे. त्यानिमित्त शुक्रवार, दि. ९ रोजी संकल्पपूर्ती मेळाव्याचे आयोजन केले असून, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील यांनी दिली.
नरेंद्र पाटील यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित होते. नरेंद्र पाटील म्हणाले,मराठा बांधवांना उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत करण्यासाठी या मंडळाची स्थापना केली.मंडळाच्या माध्यमातून १ लाख मराठा बांधवांना ८ हजार ५०० कोटींची कर्जवाटप केले असून, त्याबदल्यात ८५० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. सातारा जिल्ह्यात ७ हजार ५९५ लाभार्थी आहेत. बँकांमार्फत ७१७ कोटींचे कर्ज वितरण केले असून, त्यांना ६० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ हजारांहून अधिक तरुणांना २१६ कोटींचे कर्जवाटप केले आहे.
महामंडळातर्फे १ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती मेळाव्याचे शुक्रवार, दि. ९ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजन केले आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते काही उद्योजकांचा तसेच जिल्हा बँकेचा सत्कार घेतला जाणार आहे.
दरम्यान,कर्ज मिळवून देतो, अशी सोशल मीडियावर पोस्ट फिरवून अनेक दलाल पैसे घेत असल्याच्या तक्रारी समोर येतात. ते पैसे घेतात, असेही सांगितले जाते. मात्र, त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, असे सांगितल्यास कोणी तयार होत नसल्याचेही कबुली नरेंद्र पाटील यांनी दिली. तरुणांनी दिलेली कर्ज व्यवसायासाठी वापरत आहोत की नाही, याचे ऑडिट केले जात असल्याचेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.