सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खेड, ता. सातारा येथील ग्रामपंचायत हद्दीतील रत्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून साडे सहा हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक ज्ञानेश्वर दगडू गायकवाड (वय ४५, रा. सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हा पोट ठेकेदार असून त्याने खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत साडे तीन लाख रुपये किमंतीचे रस्त्याचे काम केले होते. या कामाचा चेक काढण्यासाठी पोट ठेकेदाराकडे ग्रामसेवक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी लाचेची मागणी केली होती. त्यानुसार आज सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. यावेळी पोट ठेकेदाराकडून ग्रामसेवक ज्ञानेश्वर गायकवाड यांना साडे सहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.