… अन्यथा निळे कफन, काळे मास्क लावून आंदोलन

दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रिपाइं (ए) चा इशारा

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुरोगामी महाराष्ट्रात मागासवर्गीय आणि दलितांवरील अन्याय-अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निळे कफन, काळे मास्क लावून आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपाइं (ए) च्या वतीने देण्यात आला आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आदेशाने आणि जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहाळ यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन छेडण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अरविंद बनसोडे (रा. पिंपळधरा, ता. नरखेड, जि. नागपूर) याची जातीयवाद्यांकडून झालेली हत्या आणि विराज जगताप (रा. पिंपळे सौदागर, जि. पुणे) याच्यावर जातीयवाद्यांनी हल्ला करून केलेला खून या दोन्ही घटनांमुळे दलित समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मागासवर्गीयांच्या खुनाच्या केसेसचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, ज्यांच्यावर पूर्वी अनुसूचित जाती जमाती ऍक्टच्या केसेस असतील त्यांच्यावर मोका किंवा झोपडपट्टी ऍक्टनुसार कारवाई करण्यात यावी, पीडितांना 40 दिवसांच्या आत आर्थिक मदत देण्यात यावी तसेच ज्या कुटुंबातील व्यक्तीचा खून झाला असेल त्या कुटुंबातील व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी, अशा मागण्या रिपाइं (ए) च्या वतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा सरकारने गांभीर्यपूर्वक विचार केला नाही तर निळे कफन, काळे मास्क लावून जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. या पत्रकावर जयवंत कांबळे, गणेश येवले, राजू ओव्हाळ, लल्लू शेठ, सुरेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



error: Content is protected !!