सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ८१ वा औंध संगीत महोत्सव अश्विन वद्य पंचमी सोमवार दि.२५ रोजी साजरा न करता हा संगीत महोत्सव रविवार दि.७ नोव्हेंबर रोजी आँनलाईन पध्दतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती संगीत महोत्सवाच्या संयोजक शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या सहसचिवअपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांनी एका लेखी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत पत्रकात म्हटले आहे की, अजूनही कोरोनाचे संकट न संपल्याने हा संगीत महोत्सव सोमवार दि.२५ आँक्टोंबर रोजी अश्विन वद्य पंचमीला न घेता येत्या सोमवारी सातारा, सांगली,कोल्हापूर, पुणे, राज्य व परराज्यातून येणाऱ्या संगीत रसिक श्रोत्यांनी औंध येथे उपस्थित राहू नये .यावेळी फक्त प्रातिनिधिक स्वरुपात येथील दत्त मंदिरात पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
७ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा संगीत महोत्सव हा शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या युटयुब लाईव्ह चँनलवर व औंध संगीत महोत्सवाच्या फेसबुक पेजद्वारे रसिक श्रोत्यांना शास्त्रीय संगीताचा आनंद लुटता येणार आहे. ललित कला केंद्र गुरूकुल सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या सहकार्याने हा संगीत महोत्सव आँनलाईन पध्दतीने दोन सत्रात आयोजित केला जाणार आहे. १९४० सालापासून सुरू असलेल्या औंध संगीत महोत्सवाचे यंदा ८१ वे वर्ष आहे. कोरोनामुळे यंदा सोमवार दि.२५ रोजी हा संगीत महोत्सव आयोजित केला जाणार नाही.
रविवार दि.७ नोव्हेंबर रोजी आँनलाईन पध्दतीने होणारा संगीत महोत्सव सकाळी दहा वाजता सुरू होणार असून पहिल्या सत्रात पुणे येथील ललित कला केंद्राचे मयूर महाजन यांचे गायन सादर केले जाणार आहे.त्यांना संवादिनी साथ अभिनय रवंदे करणार आहेत तर तबला साथ सौरभ क्षीरसागर करणार आहेत.त्यानंतर संवादिनी वादक व रचनाकार डॉ. चैतन्य कुंटे यांच्या संवादिनी वादनाचा कार्यक्रम होणार आहे.पहिल्या सत्राची सांगता शास्त्रीय गायिका श्रीमतीमंजिरी आलेगावकर यांच्या गायनाने होणार आहे. द्वितीय सत्राची सुरुवात सायंकाळी पाच वाजता युवा व्हायोलिन वादक मानसकुमार यांच्या व्हायोलिन वादनाने होणार आहे.त्यानंतर युवा गायक आदित्य मोडक यांचे गायन होणार आहे. सुप्रसिद्ध तबला वादक विश्वनाथ शिरोडकर यांचे एकल तबला वादन होणार आहे.दुसऱ्या सत्राची सांगता सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती देवकी पंडीत यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे अशी माहिती पत्रकाद्वारे अपूर्वा गोखले यांनी दिली.
You must be logged in to post a comment.