सातारा लोकसभेसाठी कोण कोण असणार रिंगणात सोमवारी होणार चित्र स्पष्ट
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवारी पार पडली. या छाननीमध्ये तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे यांच्यासह २१ उमेदवारांचे ३० उमेदवारी अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत.अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी दुपारी संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीत अखेर २४ उमेदवारांनी आपली ३३ नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. या सर्व नामनिर्देशन पत्रांची शनिवारी छाननी करण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले त्यामुळे निवडणुकीसाठी आता २१ उमेदवार पात्र ठरले आहेत.सोमवारी दिनांक २२ रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (शरदचंद्र पवार) दाखल शशिकांत शिंदे यांचा अर्ज वैध ठरल्याने वैशाली शिंदे यांनी दाखल केलेला डमी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. तर उर्वरित दोन उमेदवारांचे अर्ज अपूर्ण माहिती,कागदपत्रे असल्याने अवैध ठरले.
वैशाली शशिकांत शिंदे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार), राहूल गजानन चव्हाण (अपक्ष), गणेश शिवाजी घाडगे (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद ठरवण्यात आले.
तसेच आनंद रमेश थोरवडे(बहुजन समाज पार्टी), श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले (भारतीय जनता पार्टी),शशिकांत जयवंतराव शिंदे(नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष, प्रशांत रघुनाथ कदम (वंचित बहुजन आघाडी), तुषार विजय मोतलिंग (बहुजन मुक्ति पार्टी), दादासाहेब वसंतराव ओव्हाळ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), दिलीप हरिभाऊ बर्गे (भारतीय जवान किसान पार्टी), सयाजी गणपत वाघमारे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले (अपक्ष), सुरेशराव दिनकर कोरडे (अपक्ष), संजय कोंडीबा गाडे (अपक्ष), चंद्रकांत जाणू कांबळे (अपक्ष), निवृत्ती केरु शिंदे (अपक्ष), प्रतिभा शेलार (अपक्ष), सदाशिव साहेबराव बागल (अपक्ष), मारुती धोंडीराम जानकर (अपक्ष), विठ्ठल सखाराम कदम (अपक्ष), विश्वजीत पाटील-उंडाळकर (अपक्ष), सचिन सुभाष महाजन (अपक्ष), सागर शरद भिसे (अपक्ष), सीमा सुनिल पोतदार (अपक्ष) या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान,पात्र ठरलेल्या उमेदवारांना २२ एप्रिल रोजी दुपारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
You must be logged in to post a comment.