रक्षक प्रतिष्ठानची मागणी; सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव येथे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याच्या घटनेत संबंधित तरुणास तत्काळ अटक करावी, अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर केले. सात दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, कोरेगावमधील अल्पवयीन मुलगी शाळेत जाताना-येताना एका तरुणाकडून वारंवार मानसिक त्रास सहन करत होती. या सततच्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी २७ जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप संशयिताला अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच संशयिताचे आई-वडील पीडित कुटुंबीयांना घरी व शेतामध्ये जाऊन तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.येत्या सात दिवसांत संशयितास अटक न झाल्यास कोरेगाव पोलीस स्टेशनसमोर पीडित कुटुंबासोबत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना सातारा पालिकेचे नगरसेवक गुरुदेव कांबळे, जिल्हा संघटक सुशील जाधव, तन्वीर शेख, तौसिफ शेख, आरिफ शेख, आकाश सणस, अविष्कार जाधव, अजिंक्य देवकर तसेच पीडित कुटुंबीय उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.