सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पथके घरोघरी जाऊन आवाहन करणार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात १८ लाख ५० हजार मतदार असून अठरा वर्षे पूर्ण करणारे ५० हजार नवतरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.सातारा जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दहा जणांचे एक पथक मतदारसंघ निहाय लोकांच्या घरोघरी जाऊन मतदानासाठी आवाहन करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी जिल्ह्याचे खर्च निरीक्षक उदयकुमार , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.

पथकांकडून घरोघरी जाऊन मतदानासाठी आवाहन

जितेंद्र डूडी म्हणाले, सातारा जिल्ह्यातील २४३ मतदान केंद्रांवर ५०% पेक्षा कमी मतदानाची नोंद गत पंचवार्षिकला झाली होती. उन्हाचा वाढता तडाखा तसेच मतदानाची कमी टक्केवारी याकरता मतदान कसे वाढेल,याकरिता जिल्हा प्रशासन सक्रिय आहे. तलाठी,पोलीस पाटील,अंगणवाडी सेविका तसेच महसूल कर्मचाऱ्यांचे एक पथक मतदारसंघ निहाय पन्नास घरांना भेटी देऊन मतदान करा यासाठी आवाहन करणार आहे. सातारा जिल्ह्यात १८ लाख ५० हजार मतदार संख्या असून जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे १८ वर्षे पूर्ण केलेल्या ५० हजार नवमतदारांची नोंद झाली आहे.

दिव्यांग आणि शासकीय नोकरदारांसाठी मतदानाची सोय

जिल्हा प्रशासनाच्यावतीने दोन मे रोजी महाविद्यालय निहाय प्राचार्य आणि नवमतदारांची बैठक घेऊन मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यासाठी कार्यशाळा आणि जनजागृतीचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय शासकीय मतदार साडेआठ हजार असून त्यांना कर्तव्य सेवेत असताना मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.दिव्यांग तसेच अंध बांधव यांच्यासाठी घरातून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदणीचे काम सुरू

याशिवाय सातारा लोकसभा मतदारसंघासाठी १६ उमेदवार नामनिर्देशित झाले असून सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये त्यांच्या खर्चाचा तपशील नोंदवण्याचे काम सुरू आहे.याकरिता आयआरएफएस विभागाचे निर्देशक उदयकुमार यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्यांचे काम सुरू झाले आहे.

प्रशासनाकडून मतदारांची काळजी, केल्या उपाययोजना

सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या दरम्यान मतदान करावयाचे आहे.उन्हाळ्याचा तडाखा लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मंडप उभारणी, रुग्णवाहिका, पंखे उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी ओआरएस पावडर तसेच काही सरबतांची सोय केली जाणार आहे.

मतदान केंद्रावर जिल्ह्याच्या परंपरेचा देखावा

सातारा जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यात प्रशिक्षण जवळपास पूर्ण झाले असून काही कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे. याशिवाय सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. सातारा जिल्ह्याची संस्कृती आणि परंपरा दर्शवणाऱ्या काही घटना व प्रसंग याचे जिल्ह्यातील २० मतदान केंद्रांवर चित्र देखावा उभा केला जाणार आहे.कोणत्या मतदान केंद्रांवर हे करण्यात येणार आहे.याची यादी दोन मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्ह्यात प्रशासनाकडून कारवाई, पथके तैनात

आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाने एक लाख तीस हजार रुपयेची विदेशी दारू रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले आहे.जिल्ह्यात सहा भरारी पथके तैनात असून जिल्ह्याच्या हद्दीवरील वेगवेगळ्या चेक नाक्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी टोलफ्री क्रमांक

सातारा लोकसभा मतदार संघात निवडणूक पारदर्शक व निर्भयपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाचा भर आहे. या काळात कोणी आचारसंहितेचा भंग अथवा प्रलोभने देत असल्यास त्याबाबतची तक्रार 1950 या टोल फ्री क्रमांकावर किंवा सी व्हिजल या ॲपवर तत्काळ करावी असे आवाहन करून श्री.डूडी म्हणाले की येथील तक्रारींचा निपटारा प्रशासनाकडून लवकरात लवकर करण्यात येत आहे. त्याचा वापर करावा.

मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

सातारा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे हा मतदानाचा दिवस असून या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिक, महिला, तरुणांनी पुढे येऊन मोठ्या संख्येने मतदान करुन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डूडी यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी उपाययोजना

सातारा जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले,कोयना धरण वगळून जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांमध्ये चार टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून माण ,खटाव ,सांगलीचा काही भाग येथे पाणी पुरेल असे नियोजन केले होते.जलसिंचन विभागाकडून मार्चमध्येच माण खटाव तालुक्यातील तलावांची माहिती व त्याला लागणारे उपलब्ध पाणी याचा आराखडा तयार करून ते तलाव भरून घेण्यात आले होते.जिहे कटापूर,तारळी या दोन धरणांचे काम पूर्ण झाल्यामुळे पाच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला होता.त्या पाण्याचा उपयोग करून जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाई जाणवणार नाही यासाठी उपाय योजना सुरू आहेत.त्यामुळे सातारा जिल्ह्यात टँकरची संख्या वाढलेली नाही.

चारा छावण्या उभारणार..

सातारा जिल्ह्यात चार लाख टन चारा तयार झाला असून आवश्यक ठिकाणी गावांमध्ये चारा छावण्या उभारण्याच्या परवानगी देण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांना मुरघास उत्पादन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी पेरणी यंदाच्या संदर्भात समन्वय ठेवावा म्हणजे आगामी खरीप हंगामाचे त्यांचे नुकसान होणार नाही.असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले

error: Content is protected !!