आमची विकासकामे बोलत असल्याने विरोधकांकडे टिकेला मुद्देच नाहीत : खा. उदयनराजे

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शेंद्रे येथील मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : खासदार व आमदार म्हणून आम्ही बंधू सातारा तालुक्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास करीत आलो आहोत. विरोधकांच्या टिकेला कामातूनच उत्तर दिले जाते, जेव्हा टीकेचे मुद्देच उरत नाहीत, तेव्हा त्या आपोआपच निष्प्रभ होतात, असे प्रतिपादन खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

सातारा -जावली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शेंद्रे येथे बुधवारी सायंकाळी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टी कार्यकारिणीचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, लोकसभा संयोजक सुनील काटकर,कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे,सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, नगर विकास आघाडीचे अमोल मोहिते, ॲड.दत्तात्रय बनकर, परळीचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार,धनंजय जांभळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आम्ही राजघराण्यात जन्माला आलो आहोत, हे आमचे भाग्य आहे. आम्ही दोघेही कधीही स्वार्थी विचार करत नाही. मात्र स्वार्थी विचार केवळ एकच करतो की, जनतेची सेवा आमच्या हातून घडली पाहिजे. मोठमोठ्या पदांवर पोहोचण्याची सर्वांनाच अपेक्षा असते, मात्र जनतेच्या हिताचे निर्णय होणे अपेक्षित आहे. महायुतीच्या माध्यमातून विधानसभेला योग्य तो उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे.

एकेकाळी महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. मात्र गेल्या दहा वर्षात असे काय घडले लोकांनी भारतीय जनता पार्टीला मनापासून स्वीकारले आहे. जिल्ह्यात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूया. सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आपल्याला विजयी करावयाचे आहे. त्यासाठी आपण कामाला लागूया,असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, महायुती सरकारने वेळोवेळी लोकहिताचे निर्णय घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. विरोधकांना बोलायला जागा नसल्यामुळे केवळ अफवा म्हणून वेगवेगळ्या योजनांवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्याची चौफेर प्रगती सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर लाडकी बहिण योजनेची ओवाळणी वाढवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे लोकहिताचे निर्णय घेणाऱ्या महायुतीला आपण मनापासून साथ द्यावी आणि लोकसभेत दाखवलेली एकजूट विधानसभा निवडणुकीतही दाखवावी, असे आवाहन करून शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले की, लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. परंतु या योजनेने झालेली आमची लोकप्रियता सहन न होऊन विरोधक आज या योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत, म्हणून अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवता कामा नये. महाविकास आघाडीने पसरवलेला अफवांचे आपण खंडण केले पाहिजे. प्रत्यक्षात पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे महिला महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. याचाच धसका विरोधकांनी घेतला आहे. निवडणूक झाल्यानंतर बहिणींची ओवाळणी वाढवली जाणार आहे.

कृषी पंपाचे साडेसात एचपी पर्यंतचे वीज बिल शून्य करण्यात आले आहे.त्यामुळे देणारे कोण आहे आणि विरोध करणारे कोण आहे याचा जनतेने विचार करावा. आपण सुज्ञ आहात. महायुतीच्या माध्यमातून उरमोडी धरणाचे कॅनॉल झाले. मोठ-मोठे निर्णय हे होत आहेत. खऱ्या अर्थाने ऊस उत्पादकाला न्याय अमित शहा यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या राजकारणात हा निर्णय मुद्दाम लांबवण्यात आला पण अमित शहा यांनी केंद्रीय सहकार मंत्री या नात्याने ऊस उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेतला. लोकसभेत किमान पायाभूत आधार किंमतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. एकीकडे विरोध करणारे महाविकास आघाडी आहे. तर दुसरीकडे काम करणारे महायुतीचे सरकार आहे. याचा विचार जनतेने केला पाहिजे.

मराठा व ओबीसी यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडायची वेळ आली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे एकेकाळी महाराष्ट्रात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जात होता. मग त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही, असा सवाल शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा पेच वाढवायचा नसेल तर महायुतीला मनापासून साथ दिली पाहिजे. कायद्याच्या निकषावर टिकणारे मराठा आरक्षण हवे असेल तर त्याचा पर्याय म्हणजे फक्त महायुती आहे, असेही आ.शिवेंद्रसिंहराजे ठामपणे म्हणाले.

ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत संपूर्ण सातारा विधानसभा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागे उभे राहिला. तशीच ताकद आपल्याला आता विधानसभा निवडणुकीत दाखवायची आहे. आणि अफवा पसरवणाऱ्या प्रवृत्तींना आपण रोखठोक उत्तर द्यावयाचे आहे, अशी अपेक्षाही व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजे यांनी किमान ८० टक्के मतदान भाजपलाच होईल, याचा मतदार व कार्यकर्त्यांनी विचार करावा, असे आवाहनही केले.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांचाही भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच विविध वक्त्यांची समयोचित भाषणे झाली.

या मेळाव्यास महायुती व मित्र पक्षाचे सर्व प्रमुख नेते,पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!