सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जाऊन कार्यरत असलेल्या कोविड योद्धा आशा स्वयंसेविकांना आपल्या मागण्यांसाठी संप करावा लागला. महाराष्ट्र राज्य आशा-गट प्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने लेखी निवेदन दिल्यानंतर वडूज पंचायत समितीच्या आवारात घोषणाबाजी करून प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न केले.
कोविड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कोविड योद्धा बनून आशा स्वयंसेविका यांनी सार्वत्रिक लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण, तपासणी, नोंदणी त्याच बरोबर या प्रशासकीय इतर प्रकारची कामे पूर्ण केली आहेत. प्राथमिक आरोग्य सेवा, विलगिकरण कक्ष मध्ये आठ तासांपेक्षा जास्त कामे करावी लागली आहेत. त्यांचा शासकीय सेवेत समावेश करावा, भत्ता व वेतन वाढवून मिळावे.कोविड बाधित झाल्यास उपचार केंद्रात राखीव बेड उपलब्ध करावा,मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांचा विमा निधी द्यावा,रिक्त पदे भरावीत, आरोग्य साहित्यांसहित इतर सोयीसुविधा अशा प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील सर्व आशा स्वयं सेविका व गट प्रवर्तक यांनी वडूज पंचायत समितीच्या आवारात मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी काही काळ घोषणाबाजी केली.
तालुक्यातील सर्व आशा स्वयं सेविका यांनी गटविकास अधिकारी रमेश काळे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.युन्नूस शेख यांना प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन दिले.तर आपल्या मागण्या संदर्भात वरीष्ठांमार्फत शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्वास गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी यावेळी दिला.
You must be logged in to post a comment.