सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही गाडीतून आज संत ज्ञानेश्वर माऊली व तुकोबा महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी पालखी मार्गावर सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण रस्त्यावर भाविकांनी फुलांची उधळण करत आपली श्रध्दा विठोबारायाच्या चरणी अर्पण केली.
आळंदीहुन पालखी सोहळ्यासाठी पायी जाणारा सोहळा हा खरं तर महाराष्ट्रातील अभूतपूर्व प्रबोधन भक्तीसोहळा आहे. पायी वारीला मोठी परंपरा आहे. मूळचे सातारा जिल्हयातील ‘आरफळ’ गावचे संत हैबतबाबा यांनी वारीला शिस्त लावली. अजूनही या सोहळ्याचे प्रवर्तक म्हणून ह.भ.प. हैबतबाबांना ‘मालक’ या नावाने मान दिला जातो.स्वराज्याच्या सेवेत रुजू असणाऱ्या ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या सेवेतून निवृत्ती घेतलेल्या ह.भ.प आरफळकर महाराजांनी खंडित झालेला वारी सोहळा पुन्हा सुरू केला. वारीला शिस्त लावली. ज्याप्रमाणे एखाद्या राजाला हत्ती घोडे पालखी, अब्दागिरी असा लवाजमा असतो त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींना देखील असावा म्हणून बेळगावचे शितोळे सरकार यांच्याकडून तो मिळवून दिमाखात पालखी सोहळा सुरू झाला.
गेल्यावर्षी आणि यंदा कोरोना संकटात हा सोहळा ठराविक वारकऱ्यांच्या संख्येत प्रशासनाच्या नियमात पार पडत आहे. आषाढीच्या पूर्व संध्येला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही गाडीतून आज संत ज्ञानेश्वर माऊली व तुकोबा महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. पालखी सोहळा विठू माऊलीच्या पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना रस्त्यामध्ये भाविकांनी फुलांची, भंडाऱ्याची उधळण करत आपली श्रद्धा विठोबारायाच्या चरणी अर्पण केली.
You must be logged in to post a comment.