सातारा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

स्ट्राँग रूमवर सीसीटीव्हीची नजर; उद्या दुपारी १ वाजेपर्यंत निकाल

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): २६२ सातारा विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ४२ हजार ६७२ मतदारांपैकी २ लाख १७ हजार ७०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून ६३.५३ टक्के मतदान झाले आहे. मतदानानंतर आता उद्या शनिवारी मतमोजणी होत आहे.सकाळी ८ वाजता सर्वप्रथम टपाली मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होणार असून सुमारे ४० टेबलवर २४ राऊंडमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. साधारण दुपारी १ वाजेपर्यंत निकाल हाती येईल, अशी माहिती सातारचे प्रांताधिकारी तथा २६२ सातारा विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी ‘भूमिशिल्प’ शी बोलताना दिली.

दरम्यान आज शुक्रवारी उद्याच्या मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पार पडले.यावेळी निवडणुक निरिक्षक श्रीमती वंदना वैद्य, प्रांताधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले,सातारा तहसीलदार तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी नागेश गायकवाड, जावळी तहसिलदार तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी हणमंतराव कोळेकर, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित बापट, सातारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी सर्व मतमोजणी कामी असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या.

२६२ सातारा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ४२ हजार ६७२ एकुण मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ७१ हजार ३७२ पुरुष मतदार आहेत तर १ लाख ७१ हजार २६२ महिला तसेच इतर ३८ मतदार आहेत. त्यापैकी या निवडणुकीत समावेश असणाऱ्या ४६४ मतदान केंद्रावर १ लाख ११ हजार १२० पुरूष मतदारांनी तर १ लाख ६ हजार ५६७ महीला तसेच इतर १३ असे मिळून २ लाख १७ हजार ७०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याप्रमाणे एकुण ६३.५३ टक्के मतदान मतदारसंघात झाले आहे.

दरम्यान, उद्या शनिवारी सातारा एमआयडीसी येथील शासकीय गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे.मतमोजणीसाठी ४० टेबल असून यापैकी पहिल्या १५ टेबलवर टपाली मतांची मोजणी होणार आहे. तर १६ ते ३५ टेबलवर मतदान यंत्रातील मतांची मोजणी होणार असून २४ राऊंडमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. याशिवाय त्यानंतरच्या पाच टेबलवर सैनिकांच्या मतांची मोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे ४०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून दुपारी १ वाजेपर्यंत सर्वच चित्र स्पष्ट होईल असेही श्री. भोसले यांनी सांगितले.

सीसीटीव्ही सह… त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त

एमआयडीसी परिसरातील गोडावूनमध्ये मतमोजणीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम परिसरात कडेकोट केंद्रीय सुरक्षा दल,राज्य राखीव पोलीस दल आणि पोलीस असा त्रिस्तरीय सशस्त्र बंदोबस्त तैनात असून या परिसरात कोणालाही सोडले जात नाही. याशिवाय संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवली जात आहे.

error: Content is protected !!