आता लगीनघाई सुरू बरं का… पण नियम पाळून !

लग्न समारंभांना सशर्त परवानगी; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

सातारा दि. 26 (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर जिल्ह्यातील लग्न समारंभांना परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला. 

सातारा जिल्ह्यातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, सभागृहे, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी केल्या जाणार्‍या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्याची परवानगी देण्यात आली. ही परवानगी देण्यासाठी संबंधित तहसीलदार तसेच कार्यकारी दंडाधिकार्‍यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांनी पोलिस विभागाकडील नाहरकत दाखला घेऊन पुढील अटी व शर्तींच्या आधीन राहून संबंधितांना परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.
लग्न समारंभाच्या ठिकाणी पाळावयाचे नियम
मात्र लग्न समारंभाच्या ठिकाणी सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे सूचित करण्यात आले आहे. लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करणार्‍यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात यावे. प्रत्येक व्यक्तीने तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क वापरणे बंधनकारक राहील. सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी थुंकू नये तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. लग्न ठिकाणच्या प्रवेशद्वारावर, बैठक कक्ष, भोजन कक्ष, बाथरुम, प्रसाधनगृह येथे हात धुण्याकरिता साधने व पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर्स ठेवण्यात यावेत. लग्नाच्या ठिकाणी सामाजिक अंतराचा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा. 1% सोडियम हायड्रोक्लोराईड वापरुन त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. दुमजली किंवा त्यापेक्षा जास्त मजली इमारत असेल तर वरच्या मजल्यावर जाण्या-येण्यासाठी जिन्याचा वापर करावा. लिफ्टचा वापर केल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. त्यामुळेलिफ्टचा वापर न करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. लग्नकार्यास उपस्थित राहणार्‍या 50 व्यक्तींनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू प डाऊनलोड करणे बंधनकारक आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने गरज भासल्यास डिपॉझिट भरले असले तरी कोणत्याही क्षणी आपणास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल व त्यास शासन जबाबदार राहणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय साथरोग अधिनियम व भारतीय दंड संहिता कलमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात म्हटले आहे. 
दरम्यान, लॉकडाऊनमुळे गेली तीन महिने बंद असलेली मंगल कार्यालये, खुले लॉन, हॉल, सभागृहे सशर्त का होईना पण उघडण्याची परवानगी दिल्याबद्दल जिल्ह्यातील लॉन, हॉल तसेच मंगल कार्यालय चालक-मालकांनी जिल्हाधिकार्‍यांचे आभार मानले.
error: Content is protected !!