मुलगी झाली हो’ च्या सेटवर संभाजी ब्रिगेडकडून चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :अभिनेते किरण माने यांना मालिकेतून डच्चू दिल्यानं वादात सापडलेल्या स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या सेटवर जाऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखल्याचं समजतं.

सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्याने किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप होत आहे. स्टार प्रवाह वाहिनीनं हा आरोप फेटाळला आहे. माने यांचं मालिकेतील सहकलाकारांशी वागणं चांगलं नसल्यामुळं त्यांच्यावर कारवाई केल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. यावरून दोन गट पडले आहेत.

मालिकेतील काही कलाकारांनी माने यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत, तर काही कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. किरण माने यांच्याकडून आपल्याला कधीच, कुठलाही त्रास झाला नसल्याचं काही कलाकारांनी म्हटलं आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगानं स्टार प्रवाह वाहिनीला नोटीसही बजावली आहे. त्यामुळं हा वाद चिघळला आहे.सातारा जिल्ह्यातील गुळुंब इथं ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. तिथं संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते धडकले व चित्रीकरण बंद करण्याची मागणी केली. भुईंज पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर शूटिंग पुन्हा सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

error: Content is protected !!