सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्रात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीत एकमत नसून परस्पर विरोधी वक्तव्ये केली जात आहेत. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत एकमत नसल्याने भाजपाकडूनही राज्य सरकारवर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी सातारमध्ये आंदोलन करून औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असा फलक लावला आहे.
औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना, भाजप यांच्यासह मनसेनेही केली आहे. मात्र, या मागणीला काँग्रेसकडून विरोध दर्शवला जात आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. याचदरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी सातारा एसटी बस स्थानकावर आज दुपारी आंदोलन केले. तसेच औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसवर लावलेल्या फलकाला ‘छत्रपती संभाजीनगर’ असा फलक लावला. त्यामुळे बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सातारा शहर पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले.यावेळी मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार म्हणाले, औरंगाबाद शहराचे छ. संभाजीनगर नामकरण करण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
You must be logged in to post a comment.