समर्थांचे दासबोधावरील निरूपणाचे लवकरच दूरदर्शनवर प्रसारण करणार : चारूदत्तबुवा आफळे

सन 2020 चा सातारा भूषण पुरस्कार ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे यांना प्रदान करताना समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, शेजारी अरुण गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले व इतर.(फोटो.अतुल देशपांडे सातारा.)

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): आज देशातील विविध चॅनेल्सवर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे .विविध पुराणांचे विषय ही चॅनेल्स वरून माहिती देत असताना सर्वसमावेशक अशा दूरदर्शनवरून राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधावरील निरूपणाचे भाग प्रसारित केले जाणार आहेत अशी माहिती सुप्रसिद्ध कीर्तनकार ह .भ. प. चारुदत्त बुवा आफळे यांनी सातारा येथे दिली.

संपूर्ण देशातच नव्हे तर जगात अनेक देशातून सांप्रदायिक कीर्तनाची परंपरा जोपासत अभिनय नाट्य आणि लेखन या क्षेत्रात उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे ह.भ.प.चारुदत्त बुवा आफळे यांना सन 2020 चा रा. ना गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार समर्थ सेवा मंडळ सज्जनगड चे कार्यवाह समर्थभक्त श्री योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी उपस्थितांसमोर बोलताना चारूदत्त आफळे बुवा यांनी वरील उद्गार काढले.समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र, सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या या छोटेखानी समारंभात ट्रस्टचे विश्वस्त ज्येष्ठ कर सल्लागार व लेखक अरुण गोडबोले सातारचे माजी नगराध्यक्ष व बालरोगतज्ञ  डॉ.अच्युत गोडबोले, विश्वस्त उदयन गोडबोले ,प्रद्युम्न  गोडबोले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या समारंभ पूर्वकआयोजित  करून दिला जाणारा हा पुरस्कार सोहळा यावर्षी मात्र जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटी नुसार अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि सामाजिक अंतर राखत तोंडाला मास्क लावूनच संपन्न झाला. आपल्या प्रास्ताविक भाषणात ट्रस्टच्यावतिने बोलताना अरुण गोडबोले म्हणाले की, आमचे वडील स्वर्गीय भाऊ काका उर्फ बन्याबापू गोडबोले यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून समाजातील गरजू लोकांना काहीतरी आपल्या कमाईतून आर्थिक मदत करता यावी या हेतूने या सार्वजनिक ट्रस्ट ची उभारणी केली .आज चौथी पिढी या कुटुंबियांद्वारे हे कार्यरत असून तिच्या वतीने दर वर्षी हा सातारा भूषण पुरस्कार जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिला जातो .या वर्षी करोनामुळे 2020 सालचा पुरस्कार अतिशय थोडक्यात प्रमाणात समारंभ घेऊन द्यावा लागत आहे. चारुदत्त बुवा आफळे यांनी आपल्या वडिलांची कीर्तन परंपरा पुढे ठेवून त्यातूनच समाजातील अनेक स्तरातील नागरिकांना केलेले मार्गदर्शन हे कौतुकास्पद आहे.भारतीय कीर्तन परंपरेचा उज्ज्वल वारसा उन्नत करत देशा-विदेशात तिची ध्वजा उंचावुन  कीर्तनकार आफळेबुवांनी या कलेसोबतच गायन ,कुशल अभिनेता, निरूपणकार व राष्ट्रीय विचारांचा प्रभावी वक्ता असे अष्टपैलू गुण दाखवत केलेले कार्य अतिशय आदर्श आहे, त्यामुळे या पुरस्काराची निवड ही योग्य असून विश्वस्त समितीने आपले यांची निवड केली हा पुरस्कार त्यांना देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.यावेळी रामनामी, शाल ,पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन योगेश बुवा रामदासी यांनी आफळे यांना पुरस्कार प्रदान केला.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेली ही मंडळी खरोखरच त्यांच्या मोठेपणा मुळे खूप मोठी आहेत.मला आफळेबुवांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. हे उत्तुंग कर्तुत्व मिळवण्यासाठी जन्मोजन्मीची अखंड तपश्चर्या आणि साधना आहे .हा पुरस्कार म्हणजे आफळे बुवा यांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला मिळालेला गौरव आहे. सत्काराला उत्तर देताना चारुदत्त बुवा आफळे म्हणाले की ,सज्जनगडावरील समर्थ समाधीपुढे कीर्तन करण्याची परंपरा आपल्या कुटुंबियांना मिळाली . तेव्हापासून अखंड कीर्तन परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे सुरू असून परमेश्वर कृपेने उच्चशिक्षित कीर्तनकारांची पिढी भले नोकरीची संधी उपलब्ध असूनही बाजूला ठेवत ही कीर्तन परंपरा पुढे सुरू ठेवली व त्यासाठी आमचे वडील ह.भ.प.गोविंदस्वामी आफळे यांनी घालून दिलेला दंडक आमची पिढी पुढे नेत आहे. पुरस्काराच्या रूपातून मिळालेली ही शाबासकी ही नव्या कार्याच्या पालखीची आणखी एक धुरा असल्याचे मी मानतो .महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षात संस्कृती परंपरेतील पाचही कीर्तन संप्रदायांना एकत्र करून कीर्तन महोत्सवासारखा  किर्तन परंपरेला सन्मान देणारा महोत्सव काही अपरिहार्य कारणामुळे झाला नाही .मात्र किर्तन विश्व या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून येत्या गुढीपाडवा ते पुढील गुढीपाडव्यापर्यंत दर आठवड्याला समस्त श्रोत्यांना नामवंत कीर्तनकारांची कीर्तने अनुभवायला मिळणार आहेत .या पुरस्काराने दिलेली जिद्द व उर्मी मी आता समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध वरील निरूपणासाठी दूरदर्शनवरून प्रस्तुत करणार आहे .समर्थ भक्त स्व.मारुती बुवा रामदासी यांनी याबाबत केलेली अपेक्षा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असून खऱ्या अर्थाने पुरस्काराला न्याय देण्याचा हा मी प्रयत्न करणार आहे. या पुरस्काराबद्दल मी ट्रस्टचे विशेष आभार मानतो.

या कार्यक्रामास समर्थ सेवा मंडळाचे प्रवीण कुलकर्णी ,राजू कुलकर्णी, प्रतिक कोठावळे, सौ .अनुपमा गोडबोले, सौ. अंजली गोडबोले ,सौ.अनुराधा गोडबोले ,सौ. प्रियंवदा गोडबोले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!