बहिष्कारः चीनी वस्तुंवर ?

कोविड १९ अर्थात कोरोना या महामारीच्या संकटामुळे केवळ भारताचीच नव्हे तर अवघ्या जगाची अर्थव्यवस्था कोलमडून गेलीय. महासत्ता असणारे, विकसित असणारे आणि जागतिक व्यवहार संबधात पहिल्या आवर्तनात वावरणारे अमेरिका, जर्मनीनीसह अन्य देशांनीही हात टेकलेत. अमेरिकेने हाइड्रॉक्सी-क्लोरोक्वीन भारताकडून मध्यंतरी कितीवेळा आयात केलंय हे आपणास माहीत आहेच. थोडक्यात जग हे परस्पर व्यवहार संबधावर आज चालतांना दिसतेय, हे नाकारून चालणार नाही.

अलिकडच्या जागतिक घडामोडीच्या एकूण पार्श्वपरिस्थितीत चीन आणि भारत यांच्यांतील तणाव ताणला गेलाय. मागच्या आठवड्यापासून तर ‘सीमेवर’ चकमकी उडू लागल्यात. त्यामुळे या उभय देशांसह जगभर पुन्हा व्यापारसंबधावर टाच येईल की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. भारतातल्या अवघ्या सोशल मिडियातून चीनी वस्तुंवर बहिष्कार टाका अशा आशयांच्या संदेशाचे जत्थे वेगाने धावू लागलेत. एखाद्या ग्रुपवर येऊन हे जत्थे थांबलेच तर लगेच कोणातरी ॲक्सिलेटरवर जोर देऊन पुन्हा ते संदेशाचे जत्थे रन करतोय. त्यामुळे मोठे गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय. मोबाईलच्या दुकानातला आजचा अनुभव असा सांगतो आहे की, विवो, ओप्पो यासारखे मोबाईल आता खरेदी करू नका कारण हे मोबाईल बिघडले तरी इथूनपुढे भारतात कुठेच दुरुस्त करुन मिळणार नाहीत वगैरे वगैरे इथपर्यत चर्चा जाऊन ठेपलीय. थोडक्यात कोणत्याही परिस्थितीत चीनी वस्तुंवर बहिष्कार घालाच असाच सूर सर्वत्र उमटताना दिसतोय.

मुद्दा हा आहे की, आपण यापूर्वी घरात जो टिव्ही, फ्रिज, कूलर, मिक्सर, फॕन, गिझर, वाशिंग मशिन, गुडनाईट लिक्विड अशा अनेक घरोपयोगी वस्तू खरेदी केल्यात त्याचं काय करायचं. शिवाय आपल्या मोबाईलमध्ये in build काही गेम्स असतील, कदाचित टीकटॉक ॲप असेल. महत्वाचे म्हणजे आपण जे मेसेज व्हॉटसॲपहून शेअर करतोय ते ॲप या आणि अशा कितीतरी बाबी असणार ज्याला चीनचा ‘संसर्ग’ झालेला नाही असे नाही. ज्याला आपण मेड इन चायना म्हणतो. मग या सर्व वस्तुंचे काय करायचे हा मुद्दा ओघाने समोर येतोच ना !

अमेरिकेने जपानवर १९४५ साली बॉम्ब टाकला होता. तेव्हापासून जपानने अमेरिकेचे कोणतेच उत्पादन आयात केले नसल्याचे सांगितले जात आहे. तब्बल ७१ वर्षे जपानने हे धोरण अवलंबल्याची पुष्टीही मेसेजमध्ये जोडली जातेय. खरंतर, इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की एकाहत्तर वर्षापूर्वीची गोष्ट आज सागून चालेल काय. ग्लोबलायझेशनच्या या कालखंडात आंतरराष्ट्रीय व्यवहार निती समजून घेणं गरजेचं आहे. बहिष्कार टाकताना आपण यापूर्वी आपल्या घरात ज्या काही वस्तू आणल्या आहेत, त्या फेकून देणार आहोत काय किंवा त्या तोडून टाकणार आहोत काय ? देशभक्तीच्या नावाखाली यापध्दतीने बहिष्काराचं हत्यार उपसणार आहोत काय ? हे आणि असे अनेकविध प्रश्न विचारता येतील. मात्र प्रश्न मुद्दा विचारण्याचा अजिबात नाही. आहे तो देशभक्तीचा !

देशभक्ती जरुर असायला हवी परंतु अंधभक्तासारखी नको. राष्ट्रनिष्ठा ही डोळस असते. चीन आणि भारताचे संबध बिघडलेत त्यामुळे आपण बिघडून कसे चालेल. चीनच्या विरोधात जो संताप, चीड, खदखद आहे ती आपण आपल्यावरच काढणं योग्य आहे काय. शिवाय चीनच्या विरोधात असणारा प्रत्येक मेसेज ‘फूल्ल’ ताकदीने डोळे झाकून फॉरवर्ड करत रहाणं हे तरी योग्य आहे काय. याचा विचार झाला पाहिजे. मुळात चिन आणि भारत यामध्ये काय घडलंय, काय बिघडलंय हे नीटपणे समजून घेतले पाहिजे. आपणच बहिष्कार टाकून घरातल्या वस्तूंची तोडफोड करू लागलो तर युध्दजन्य परिस्थिती निर्माण करणा-या चिथावणीखोर त्या राज्यकर्त्याचे थोडीच नुकसान होणार आहे. झालेच तर आपलेच होणार आहे. कारण आपल्या घरातल्याच वस्तु फुटणार आहेत. भारत चीन या उभयंतामधले द्वंद्व होईल तेव्हा होईल, पण अशी द्वंद्वे का होतात हेही जाणलं पाहिजे. फेसबूक फ्रेंड असणा-या एका मित्राने (नाव आठवत नाही) त्यांच्या वॉलवर असे म्हटलंय, युध्दे ही बहुजनांच्या रक्तावर आणि अभिजनांच्या बेगडी राष्ट्रप्रेमावर खेळली जातात !’ सिमेवरती मरतात, रक्त सांडतात ते तुमच्याआमच्या गरीब, सामान्य, सर्वसामान्य बहुजन कुटुंबातील जवान असतात. राज्यकर्त्यांची, उद्योगपतीची, कार्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या हुद्यावर कार्यरत असणा-यांची ती मुले खचितच नसतात.

त्यामुळे युद्ध छेडायला दोन्ही देशातल्या ‘त्या’ राज्यकर्त्यांचे काहीच जात नसतं. उलट आपले मुलकी अपयश लपविण्याकरिता आणि आंतरराष्ट्रीय सत्ताकारणातील आपले डाव बेमालूपणे साद्य करण्यासाठीचा हा उभयंतामधला अलिखित करार असतो, असू शकतो. बाजारपेठ, कोरोना, अमेरिकेचा दबाव, जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र संघ या सर्व संदर्भासह विद्यमान परिस्थितीच्या अनुषंगाने भारत चीन यातला सौहार्द धोक्यात आलाय. त्यातच गेल्या कैक वर्षांचं चीन भारत यांच्यातलं वैमनस्य या सां-याचा collective effect म्हणजे कालपरवाची भारत चीन सीमेवरची चकमक आहे. तेव्हा भावनिक न होता, भारत चीन यातले ‘युध्द’ कशी कूस बदलतेय हे पाहणे महत्वाचे आहे !

अ रु ण  वि श्वं भ र
९८ २२ ४१ ५४ ७२







error: Content is protected !!