सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): ‘आम्ही सातारकर’ विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्या माध्यमातून दसरा मेळाव्याचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. २०२३ यावर्षी सामाजिक विभागातून ‘सामाजिक रत्न’ पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करत असलेले श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचा वितरण सोहळा श्री. शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी राजेंद्र चोरगे यांना ‘सामाजिक रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सातारकरांनी या सर्व समस्यावर मात करण्यासाठी धर्म, जात, पंथ, पक्ष इत्यादी सर्व भेदभाव बाजूला ठेवून ‘आम्ही सातारकर’ म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई व परिसरातील असंख्य सातारकरांना एकत्र आणण्यासाठी १७ वर्षापूर्वी राजाराम (नाना) निकम, माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली ‘आम्ही सातारकर’ विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून असंख्य सातारकरांच्या अडचणी सोडवल्या जात असून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिंचा सन्मान करून प्रोत्साहन दिले जात आहे.
श्री.शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर, मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात पुसेगाव देवस्थानचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते राजेंद्र चोरगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेश भोसले, दि. कराड अर्बन बँकेचे संचालक सुभाष एरम, सुभाष जोशी, आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम (नाना) निकम, माजी आमदार बाबुराव माने, संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र चोरगे यांचे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था, श्री बालाजी ग्रुप व मित्र परिवार तसेच शाहूनगरवासियांनी अभिनंदन केले.
You must be logged in to post a comment.