सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, लोणंद नगरपंचायतीचे नगरसेवक व काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड बाळासाहेब बागवान यांचे दि. २६ रोजी रात्री ९ वाजता वयाच्या ६५ व्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
संपूर्ण आयुष्य बहुजन समाजासाठी तसेच गोरगरीब जनतेसाठी झटणारे त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख जात होते. त्यांनी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून दुष्काळी खंडाळा तालुक्याला पाणी मिळविण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी दिलेल्या लढ्याला धोम-बलकवडी धरणाचे पाणी खंडाळा तालुक्यास मिळाले.
पाणी प्रश्नांसाठी पाणी परिषद आणि आंदोलन करीत असताना त्यांनी लोणंद ग्रामपंचायत, जिल्हा परिषदमध्ये काम केले. तसेच ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यानंतर ते नगरसेवक म्हणूनही काम केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण लोणंद नगरी शोकसागरात बुडाली. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन करण्यासाठी सईबाई हाउसिंग सोसायटी येथील त्यांच्या निवासस्थानी मोठा जनसागर उसळला होता. त्यांच्या अंत्यविधीस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.