निर्बंध शिथिल केल्यानंतर लोकांना संयम ठेवण्याचे पालकामंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात निर्बंध लावले होते. आजपासून ते निर्बंध शिथील करण्यात आले. बाजारपेठांमध्ये आज गर्दी दिसत आहे. गर्दी करणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे, तरी नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये व बाजारपेठांमध्ये गर्दी करु नये व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

सातारा तालुक्यातील अतित या गावाने सुरु केलेल्या कोरोना केअर सेंटरला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या भेटी प्रसंगी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, चंद्रकांत जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ कोरोनाची चाचणी करावी, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, त्याची चाचणी पॉझिटीव्ह आल्यास पहिला त्याला धीर दिला पाहिजे. रुग्णानेही घाबरुन न जाता उपचार घ्यावेत. आज गावोगावी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येत आहेत. ज्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष झाले आहे त्या त्या गावातील नागरिकांनी बाधित झाल्यानंतर गृह विलगीकरणात न राहता संस्थात्मक विलगीकरणात दाखल व्हावे.

राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय त्यांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!