श्रीकृष्ण -अर्जुनाच्या जोडीने भुवया उंचावल्या
सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील चेअरमनवरील अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर घडत गेलेल्या विविध घडामोडींची शिक्षक सभासदांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. एकेकाळचे सहकारी परंतू नंतर दुरावलेले शिक्षक नेते बलवंत पाटील व सिद्धेश्वर पुस्तके आता या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. जणू काही श्रीकृष्ण- अर्जुनाची जोडी पुन्हा जमल्याने शिक्षकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
बलवंत पाटील व सिद्धेश्वर पुस्तके हे दोघेही प्राथमिक शिक्षक संघाचे शिवाजीराव पाटील गटाचे नेते.या आधीही दोघांनी बँकेत एकत्र काम केलेले आहे. गेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व सिद्धेश्वर पुस्तके यांच्याकडे होते तर संघ व समितीच्या संयुक्त सभासद परिवर्तन पॅनलचे नेतृत्व बलवंत पाटील यांच्याकडे होते. निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे १८ संचालक निवडून आले तर पुस्तके यांच्या पॅनलचे तीन संचालक निवडून आले व परिवर्तन पॅनलकडे बँकेची सत्ता आली. यानंतर समिती व संघाला आलटून पालटून रोटेशननुसार चेअरमन, व्हाईस चेअरमनपद मिळत होते.
पहिल्यावेळी समितीला चेअरमन पदाची संधी मिळून नवनाथ जाधव हे चेअरमन झाले. दुसऱ्या वेळी संघाचे राजेंद्र बोराटे यांच्या गळ्यात चेअरमन पदाची माळ पडली. राजेंद्र बोराटे चेअरमन असताना बलवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक व बँकेच्या हिताचा काटकसरी असा कारभार झाला. मात्र नंतर समितीचे किरण यादव चेअरमन झाले आणि बँकेत खाबुगिरीला अक्षरशः ऊत आला. त्याचा क्लायमॅक्स बँकेच्या शताब्दी वर्ष महोत्सवात पाहायला मिळाला. त्यामुळे बँकेची प्रतिष्ठा धुळीस मिळाली.
किरण यादव यांच्या सात महिन्याच्या काळात घडलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकाराने व्यथीत झालेल्या बलवंत पाटील यांनी मग बँक वाचवण्यासाठी आपले हातखंडे वापरले व त्यात सिद्धेश्वर पुस्तके यांची त्यांना अर्जुनासारखी साथ मिळाली. बलवंत पाटील यांच्याकडे आधीच संघ, समितीचे मिळून बारा संचालक होते. त्यात विरोधी बाकावर असलेल्या पुस्तके यांच्या ३ संचालकांची भर पडली व किरण यादव यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर १५ जणांच्या सह्या झाल्या.किरण यादव, उदय शिंदे यांनी बँकेत जी बजबजपुरी माजवली होती, त्यांचा घडा भरला, अशा प्रतिक्रिया सामान्य सभासदांमधून उमटू लागल्या.
आता बलवंत पाटील, सिद्धेश्वर पुस्तके एकत्र आल्याने शिक्षकांची ही अर्थवाहिनी सभासदांच्या हिताचा कारभार करील तसेच यादव यांच्या काळातील त्यांच्या व उदय शिंदे यांच्या कृष्णकृत्यांना उजेडात आणून ती प्रकरणे धसास लावतील, अशी अपेक्षा शिक्षक सभासदांमधून व्यक्त होत आहे.
You must be logged in to post a comment.