बंडातात्या कऱ्हाडकर करवडीत स्थानबद्ध

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पंढरपूरच्या पायी वारीसाठी आग्रही असलेल्या बडातात्या कऱ्हाडकर यांना तापकिरवाडी येथील संकल्प मंगल कार्यालयातून दिघी आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शनिवारी सकाळी नऊ वाजता ताब्यात घेऊन त्यांना आळंदीहून कऱ्हाडला आणण्यात आले. कऱ्हाड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर बंडातात्या कऱ्हाडकर यांना करवडी येथील गोपालन केंद्रात स्थानबद्ध करून ठेवले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढीवारी सध्या सुरू झाली आहे. ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांचे पालखी देहू व आळंदीतून प्रस्थान करीत आहेत. मागील वर्षी आणि यावर्षीही महाराष्ट्र सरकारने पायी वारी न काढता बसमधून मर्यादित वारकऱ्यांच्या वारीस परवानगी दिली आहे. मात्र पायी वारी ही वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. बंडातात्या कऱ्हाडकर यांनीही शासनाकडे पायी वारीची मागणी केली. कमीत कमी वारकऱ्यांसह पायी वारीसाठी ते आग्रही होते. मात्र पायी वारी सुरू झाल्यानंतर होणारी गर्दी आणि वाढता कोरोना संसर्ग यामुळे दिघी पोलिसांनी कऱ्हाडकर यांना सकाळी नऊ वाजता ताब्यात घेतले. दुपारी एक वाजता कऱ्हाड पोलिसांच्या ताब्यात दिले. कऱ्हाड शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील आणि पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील यांनी त्याचे मागणीनुसार त्यांना येथील गोपालन केंद्रात आणून ठेवले आहे. कऱ्हाड ग्रामीण पोलीस येथे पहारा देत आहेत.

error: Content is protected !!