सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बास्केटबॉल हा विश्वातील सर्वात लोकप्रिय खेळांमधला आणि व्यापक स्वरूपात बघीतला जाणारा एक खेळ आहे. बास्केटबॉल हा रोमांचक खेळ असून आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचा खेळ आहे. बास्केटबॉल खेळल्याने सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकास होतो, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व हिंदवी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी केले.
७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये बास्केटबॉल कोर्ट (मैदानाचे) उद्धघाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव नानासाहेब कुलकर्णी, रमणी कुलकर्णी, माध्यमिक विभाग प्रमुख रामेश्वरी यादव, यास्मिन बागवान, क्रीडा शिक्षक विनोद दाभाडे, संदीप जाधव, गौरव माने, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी सर्वप्रथम विद्यार्थी साहिल शेलार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालबद्ध संचलनातून भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली.
कुलकर्णी म्हणाले, सांघिक खेळाचं आपलं असं एक खास वैशिष्ट्य असतं. अश्या खेळांमुळे सांघिक भावना वाढीस लागते, एकीचं महत्वं कळतं, अनुशासन आणि एकात्मतेचं महत्व लक्षात येतं. इतकं महत्व जर सांघिक खेळाचं असेल तर सांघिक खेळ हे खेळायलाच हवेत. आणि असाच एक सांघिक भावना वाढीस लावणारा खेळ म्हणजे बास्केटबॉल. बास्केटबॉल हा खेळ तसं पाहाता इनडोअर गेम आहे त्याला बास्केटबॉल कोर्ट वर खेळण्यात येतं. पण आउटडोअर खेळला जाणारा बास्केटबॉलचा गेम सुध्दा शहरी आणि ग्रामिण भागात वेगाने लोकप्रिय होतांना दिसतोय. अशा परिस्थितीमध्ये हिंदवी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना या खेळामध्ये करिअर करण्यासाठी या दृष्टिकोनातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी शिंदे, श्रेया घोष यांनी केले
You must be logged in to post a comment.