गाडीची पलटी होऊन झालेल्या अपघातात कृषीतज्ञ भालचंद्र पोळ यांचा मृत्यू

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – कृषितज्ज्ञ म्हणून ख्याती असलेले भालचंद्र आबासाहेब पोळ (वय-65 रा मार्डी, ता माण) यांचा शिंगणापूर नजीक गाडीची पलटी होऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

मार्डी येथील भालचंद्र पोळ यांचे दहिवडी येथे कृषी सेवा केंद्र आहे. बुधवारी दुपारी फलटण येथून दुकानातील औषधे घेऊन येत असताना कोथळे घाटाच्या वर आल्यानंतर शिंगणापूर नजीकच्या बळीपवस्ती येथील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने त्यांची गाडी पलटी झाली. या अपघातात ज्येष्ठ कृषी अभ्यासक भालचंद्र पोळ हे गंभीर जखमी झाले तर त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच शिंगणापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी स्वाती बंदुके व डॉ अतुल बंदुके तातडीने अपघातस्थळी जाऊन रुग्णवाहिका बोलावून जखमी पोळ यांना दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी पोळ यांना मृत घोषित केले.

माण तालुक्यातील पहिले कृषी पदवीधर म्हणून त्यांची ओळख आहे बी व्ही जी ग्लरुप मध्ये ही त्यांनी काम केले अनेकवेळा परदेशातही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची सःधी मिळाली. भालचंद्र पोळ हे माण तालुक्याचे माजी आमदार स्व. सदाशिवराव पोळ यांचे बंधू होते. भालचंद्र पोळ हे दुष्काळी माण तालुक्यातील शेतकऱ्यांना विनामूल्य कृषीविषयक सल्ला देत असत. दुष्काळी शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी ते मार्गदर्शन करत असत. माण तालुक्यातील जेष्ठ कृषितज्ज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक होता. भालचंद्र पोळ हे माणचे माजी आमदार कै. सदाशिवराव पोळ यांचे बंधू तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते मनोज पोळ व माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ संदीप पोळ यांचे चुलते होते. पोळ यांच्या मृत्यूने मार्डी गावासह माण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!