सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात मागील तीन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने भारत बंद पुकारण्यात आला होता. त्यास काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यास सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
केंद्र सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेला खटावमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार दुपारपर्यत शटर डाउन करून बंद करण्यात आल्यामुळे नेहमी गजबजलेली मुख्य बाजारपेठमध्ये सकाळपासूनच शुकशुकाट दिसून येत होता. फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढण्यात आली. यामध्ये आमदार दीपक चव्हाण , जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तर काॅंग्रेसच्यावतीने सरकारचा निषेध मोर्चा काढला. शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य धैर्यशिल उर्फ दत्ता अनपट यांच्या नेतृत्वाखाली फलटण -सातारा रस्त्यावर कापशी-आळजापुर फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला. त्यामुळे मार्गावर वाहतूक काही वेळ ठप्प होती.
रहिमतपूरमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास रहिमतपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाई तालुक्यात राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा देत तहसीलदार रणजीत भोसले यांना निवेदन दिले. राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस .वाय. पवार यांच्या नेतृत्त्वाखाली देशातील शेतकऱ्यांच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी खंडाळा तहसील कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच कराड तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे व शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.