सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सामाजिक कार्यकर्त्या, सातारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिला, माणदेशी फौंडेशन संस्था व माणदेशी बॅंक उद्योगाच्या शिल्पकार चेतना गाला-सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य,कला, संस्कृती , महिला विकास व परिवर्तनाची चळवळ,आदी क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या हेतूने १९९८ सालापासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह,शाल, गुच्छ असे आहे.
करोना साथीच्या निर्बंधांमुळे लांबलेला २३ वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार महिलांच्या स्वयंपूर्ण आर्थिक विकासाचे रोल मॉडेल तयार करणाऱ्या चेतना सिन्हा यांना महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या पुर्वसंध्येला १९ मार्च २०२२ रोजी नगर वाचनालयाच्या पाठक हाॅलमध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराच्या मानकरी चेतना सिन्हा यांनी ग्रामीण उपेक्षित दुष्काळ- प्रवण भागातील महिलांच्या आर्थिक साक्षरते बरोबरच मायक्रोफायनान्स क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे मौलिक कार्य केले आहे.त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या छात्र संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात तुरुंगवास भोगला. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभाग दिला आहे. त्यांना येल व अशोका सारख्या मान्यवर विद्यापीठांची फेलोशीप मिळालेली आहे. यशस्वी महिला बॅंकर म्हणून त्यांची दावोस-स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत जगातील सात महिला अध्यक्षांमध्ये गौरवास्पद निवड झाली होती. सातारा भूषणसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या माणदेशी बॅंकेला वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजच्या नारीशक्ती अवाॅर्डनेही गौरविण्यात आले आहे.
येत्या १९ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता पाठक हाॅलमध्ये त्यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे ,असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे कार्यवाह ऍड. हौसेराव धुमाळ यांनी केले आहे
You must be logged in to post a comment.