ना. गुलाबराव पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सदरबझार, सातारा येथील भीमाबाई आंबेडकर नगरमधील २५७ नागरिकांचे ६५ लाख रुपये पाणीबिल थकीत आहे. त्यामुळे या नागरिकांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. हे सर्व नागरिक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पाणी बंद केल्याने त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय होत आहे. सर्व नागरिक पुढील येणारे पाणीबिल रीतसर भरण्यास तयार आहेत. त्यामुळे खास बाब म्हणून या सर्व नागरिकांचे थकीत पाणीबिल माफ करावे, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.
सदरबझार येथील भीमाबाई आंबेडकर नगरातील २५७ नागरिकांची ६५ लाख रुपयांची पाणीपट्टी २०११ पासून थकीत आहे. या नगरात पालिकेकडून या नागरिकांसाठी घरकुले बांधण्यात आली. त्यावेळी इमारत बांधकामासाठी पाणी वापरण्यात आले, त्याचे पाणीबिल थकले आणि हे पाणीबिल येथील गोरगारीब जनतेच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे हे पाणीबिल माफ करावे अशी मागणी सर्व नागरिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती.
नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. पाटील यांची भेट घेतली. यावेळी भीमाबाई आंबेडकर नगरातील नागरिकांचे शिष्टमंडळ, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. सुवर्णा पाटील, राजू भोसले, अमोल मोहिते, फिरोज पठाण, अमित महिपाल, रीना भणगे, निर्मला पाटील, रोहिणी क्षीरसागर, मुमताज पठाण, लताबाई माने, स्वाती भोरे, जावेद सय्यद, सुधाकर मकसूद, नितीन लोंढे, जगन्नाथ म्हेत्रे, जानकर आदी उपस्थित होते.
भीमाबाई आंबेडकर नगरातील नागरिक हे रोजंदारी करून उदरनिर्वाह चालवतात. येथील महिला दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी व इतर कामे करत असतात. अशा गरीब परिस्थितीत हे नागरिक ६५ लाख रुपये एवढी मोठी रक्कम भरू शकत नाहीत. हे पाणीबिल माफ केल्यास यापुढे येणारे पाणीबिल ते नियमित भरतील असा शब्द या नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे या नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी थकीत ६५ लाख रुपये पाणीबिल माफ करावे. खास बाब म्हणून सकारात्मक निर्णय घेऊन या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पाटील यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित नागरिकांचा पाणीप्रश्न सोडवू, असा शब्द ना. पाटील यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि नागरिकांना दिला.
You must be logged in to post a comment.