उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती; जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संभाजीनगर- खिंडवाडी येथील जागेत ‘स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल उप बाजार’ या भव्य व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येणार असून या व्यापारी संकुलाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचा भव्य मेळावा होणार आहे, अशी माहिती आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
शुक्रवारी ना. फडणवीस सातारा दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता सदरबाजार- खेड येथील भारतीय जनता पार्टीच्या नियोजित जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यांनतर सकाळी ११.३० वाजता सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत महामार्गालगत संभाजीनगर- खिंडवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल उप बाजार’ या भव्य व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यांनतर ना. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक हॉल मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा भव्य मेळावा होणार आहे. त्याचवेळी नियोजित सातारा प्रांताधिकारी, तहसील कार्यालयाचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन केले जाणार आहे.
भूमिपूजन सोहळ्याला तसेच मेळाव्याला पालकमंत्री ना. शंभूराज देसाई , खा.श्रीमंत छ. उदयनराजे भोसले ,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे सर्व आजी- माजी आमदार, खासदार, सर्व आजी- माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना सातारा- जावली मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.