महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मंडपाचे भूमिपूजन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा क्रीडा संकुल येथे होणारी 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फक्त मल्ल, कुस्तीशौकिन आणि वस्ताद यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जिल्ह्यात होणारी मानाची राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर यंत्रणा सज्ज झाली आहे.नुकतीच याबाबतची बैठक पार पडली आहे.

स्पर्धेच्या मंडपाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारचा मानबिंदू असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात रंगणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी स्पर्धा आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांची बैठक घेऊन प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा विभाग आता प्रत्यक्ष आखाड्याच्या तयारीला लागला आहे.

स्टेडियमची स्वच्छता आणि रंगरंगोटी आदी कामे सध्या झाली आहेत.स्पर्धा गादी आणि माती विभागात दहा गटात होणार आहे. राज्यातील 35 जिल्हे आणि महापालिका यांच्या 45 संघातील 900 मल्ल, 100 पंच, प्रशिक्षक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मैदानाची आखणी करून मॅटचे तीन आणि मातीचे दोन आखाडे उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, आदी सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पार्किंगसह अन्य बाबींवर भर देण्यात आला आहे. स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येणार आहेत. त्यांच्या बैठकीची व्यवस्था स्टेडियमवर करण्यात आली आहे. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी विविध विभाग व समित्या कार्यरत आहेत. दरम्यान, 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मंडपाचेभूमिपूजन जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दीपक पवार, संदीप साळुंखे, बलभीम शिंगरे, बाबा सूळ, चंद्रकांत सूळ, सुधीर पवार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!