सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या कृष्णा-भिमा स्थिरीकरण योजनेसाठी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माणचे आमदार जयकुमार गोरे, दौंडचे आमदार राहुल कुल भेट घेऊन योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
या बैठकीमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने – १. कोयना व टाटा धरणांद्वारे जलविद्युत वीजनिर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातील पूर्वमुखी पाणी पश्चिमेकडे वळविण्यात येत आहे, पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना जलविद्युत वीजनिर्मितीसाठी पूर्वेकडे कृष्णा भीमा खोऱ्यातील पाणी अरबी समुद्राकडे नेले जात आहे वास्तिव पाहता या पाण्यावर पहिला हक्क असणाऱ्या कृष्णा, भीमा खोऱ्यातील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. हि बाब मा. मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. संपूर्ण महाराष्ट्रात चिबाड, क्षारयुक्त शेतजमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे त्यासंदर्भांत चिबाड शेतजमिन निर्मूलन, पृष्ठभागावर व भुपृष्ठभागाखालील चर खोदून जादा पाण्याचा निचरा करणे संदर्भात एकात्मिक धोरण आखावे तसेच राज्यातील चिबड, पाणथळ झालेल्या जमिनीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात यावे. जल जीवन अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा योजना नसलेल्या अधिकाधिक ग्रामपंचायतींचा समावेश व्हावा.
तसेच नीरा-देवधर प्रकल्पाच्या सद्य परिस्थिती बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी प्रकल्पातील उर्वरित अंदाजे १०० कि.मी. कॅनॉल बांधकामासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले. जेणेकरून या प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या भागातील शेतीसाठी या पाण्याचा मोठ्याप्रमाणात फायदा होईल. याच बरोबर माण-खटाव तालुक्यासाठी वरदायनी ठरणारी गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना जिहे_कठापूर साठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देऊन, लवकरात लवकर योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आग्रही मागणी केली.
You must be logged in to post a comment.