सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिहे कठापूरचा समावेश पीएमकेएसवाय मध्ये व्हावा अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे केली.
स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर जलसिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करावा अशी मागणी केली. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला तसे पत्र दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भागवत कराड यांना भेटून योजना संपूर्ण पूर्णत्वाला जाण्यासाठी लागणारा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंतीही त्यांनी केली.
नवी दिल्ली येथे खा. निंबाळकर आणि आमदार गोरे यांनी जिहेकठापूर योजनेच्या अनुषंगाने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयासह विविध मंत्र्यांची भेट घेतली. मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे कि ३.१७ टीएमसी पाणी उचलून माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यातील ६७ गावांमधील २७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या जिहेकठापूर योजनेसाठी जानेवारी २०२१ पर्यंत ५८७.८८ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. बॅरेज आणि रायझिंग मेन्सची कामे झाली आहेत. २०२१ मध्ये योजनेचा पहिला टप्पा सुरु करुन ७९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. उरलेले १९६०० हेक्टर क्षेत्र आगामी तीन वर्षात ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित निधी मिळत नाही. प्रकल्पाचे संपूर्ण काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेतून लागणारा सर्व निधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पाचा समावेश पीएमकेएसवाय मध्ये त्वरित करावा अशी मागणी जलशक्ती मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिहेकठापूर योजनेला निधी मिळवून देण्याबाबत विनंती केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहेकठापूरच्या वाढीव खर्चाला दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने ही योजना मार्गी लागत आहे. आता प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत जिहेकठापूरचा समावेश होवून लागणारा उर्वरित निधी केंद्राकडून उपलब्ध होणार आहे. नाबार्डमधून आणखी निधी मिळण्यासाठी मंत्री भागवत कराड यांच्याबरोबरही चर्चा केली आहे. निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
You must be logged in to post a comment.