धनंजय मुंडेंविरोधात भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्य सरकारमधील सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्यामुळे सरकारची व महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे. या मागणीला घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरभी भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शन आंदोलनात प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, शहराध्यक्षा रिना बनगे, नगरसेविका सिध्दी पवार, आशा पंडीत व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप आहेत. त्यांनी केलेल्या प्रकाराबाबत माफी मागितली असली, तरी महिलांच्या संदर्भात असा खेळ करणे त्यांना शोभत नाही. ते राज्यातील जनतेचे प्रतिनिधित्त्व करणारे नेते आहेत. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाची गरिमा राखत राजीनामा द्यावा. जर ते राजीनामा देत नसतील, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेऊन राज्यातील महिला सुरक्षित असल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

error: Content is protected !!