भाजप खासदाराकडून सहकाऱ्याची चार कोटीची फसवणूक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भाजपचे नेते आणि माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चार कोटी ४० लाखांची फसवणूक केल्याचा त्यांचे निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनीच आरोप केला आहे. खा. निंबाळकर यांच्यावर फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी दिगंबर आगवणे यांनी फलटण पोलिस स्टेशनला केली आहे.

दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलिसठाण्यात दिलेल्या अर्जात म्हटले आहे की ”२००७ मध्ये रणजितसिंह यांच्याशी आपला संपर्क आला. डेअरीच्या बॉयलरसाठी त्यांना लाकडे पुरवीत असल्याने आमच्यात आर्थिक व्यवहार होते. रणजितसिंह यांना कारखाना उभारणीसाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे २०१४ ला त्यांची पिंपळवाडी येथील जमिन गहाण ठेवत कारखान्यास कर्ज मिळविण्यासाठी व कारखान्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर डिस्टलरी प्रोजेक्टसाठी वेळोवेळी मोठ्या रकमेचे कर्ज खासदार रणजितसिंह व संचालकांनी बँकांच्या संमतीने काढले.

घनिष्ट संबंधापोटी सदर कर्जासाठी माझी जमिन गहाण ठेवली आहे. कारखाना सुरु झाल्यानंतर कोजन (वीज निर्मिती) बाबत व त्याच्या उत्पन्नाबाबत तोंडी व्यवहार झाला. त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने आपण नांदल, गिरवी येथील जमिनी गहाण ठेवून कर्ज काढले, त्याची रक्कम आरटीजीएसद्वारे खासदार रणजितसिंह यांच्या खात्यावर जमा केली, असा दावा, आगवणे यांनी केला आहे. खासदार रणजितसिंह यांना दिलेल्या कर्जापायी गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव काढल्याची नोटीस बँकेकडून मला मिळाली आहे.

error: Content is protected !!