फलटण नगरपालिकेवर भाजपचा मोर्चा

फलटण, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : शहरात सुरु असलेल्या साथीच्या रोगाचे थैमान व भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि फलटण नगरपालिकेचा गलथान कारभार याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिकेवर मोटारसायकलद्वारे  रॅली काढून मोर्चा काढण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे ,शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव ,सचिन अहिवळे, अमरसिंह नाईक निंबाळकर ,नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर ,मदलसा कुंभार ,मीना नेवसे ,माजी नगरसेवक डॉ प्रविण आगवणे, तुकाराम शिंदे, बबलू मोमीन, रियाजभाई इनामदार ,उषा राऊत, मुक्ती शहा आदी उपस्थित होते.

फलटण नगरपालिकेच्या कारभारावर टीका करताना, खासदार रणजीतसिंह म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आपण मोजकेच कार्यकर्तेसह नगरपालिकेला या आंदोलनातून इशारा देत असून, गेली तीस वर्षे फलटण पालिकेची सत्ता एकहाती असून सुद्धा फलटण शहराचा कसलाही विकास झाला नाही हे दुर्दैव आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या डेंग्यू व चिकनगुनियाच्या साथीमुळे सर्वसामान्य माणसांचे आरोग्य व आर्थिक जीवन उद्ध्वस्त झाले आहे, त्यांच्याकडे दवाखान्याचे भरायला पैसे नाहीत अशा परिस्थितीत नगरपालिका प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे ही केविलवाणी गोष्ट आहे. फलटण नगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून एक वेळा पुरविल्या जाणार्‍या पिण्याच्या पाण्यातून आळ्या आणि कुबट वास येत आहे. स्वच्छतागृह व गटाराची दुरावस्था झाली असून नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाची वाट लागली आहे. कोणत्याही सुविधा नगरपालिकेला चांगल्या पद्धतीने देता आल्या नसल्याचा आरोप खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
 

error: Content is protected !!