सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : करोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. सातारा जिल्हा बॅंकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी भाजप आणि शिवसेना नेत्यांनी या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षीय राजकारणात महाविकास आघाडीतील घटक पक्ष या निवडणुकीत एकत्र दिसणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेवर जाण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, माणचे नेते शेखर गोरे हे इच्छुक आहेत. भाजपच्यावतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अतुल भोसले यांनीदेखील निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिल्याने यंदा बँकेची निवडणूक चुरशीची होणार आहे.
दरम्यान, मागील निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई यांना जिल्हा बँकेवर संचालक म्हणून घेण्याबाबतचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता. मात्र, नंतर त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे आता शिवसेनेनेही बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जर ही निवडणूक लढली गेली नाही, तर जिल्हा बँकेत दोन पॅनेल पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे यंदाची ही निवडणूक जिल्ह्यातील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
You must be logged in to post a comment.