सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश चोरगे यांची मागणी
सातारा,(प्रतिनिधी) : शहरातील बोगदा ते शेंद्रे व बोगदा ते सज्जनगड आणि बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हा परिषद दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट झाले असून त्याचे पर्यवेक्षण करणारे उपअभियंता प्रशांत खैरमोडे यांची चौकशी करून त्यांची तत्काळ बदली करावी व संबंधित ठेकेदारांना काळे यादी टाकावे, अशी मागणी सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. गणेश चोरगे यांनी केली आहे.
याबाबत उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री.माने यांच्याकडे श्री. चोरगे यांनी लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असून निवेदनातील मागणीनुसार संबंधित ठेकेदार व उप अभियंता श्री. खैरमोडे यांच्यावर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सातारा शहरात जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक तसेच बोगदा ते शेंद्रे आणि बोगदा ते सज्जनगड या तिन्ही रस्त्यांचे डांबरीकरण काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. ही तिन्ही कामे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येत असून उपअभियंता प्रशांत खेरमोडे यांच्या पर्यवेक्षणाखाली झाली आहेत. संबंधित ठेकेदारांना या कामाची बिले सुद्धा अदा करण्यात आली आहेत. मात्र मध्यंतरीच्या मोसमी पावसामध्ये निकृष्ट दर्जाचे हे तिन्ही रस्ते वाहून गेले आहेत. या तिन्ही रस्त्यांचे डांबर वाहून जाऊन खडी उदसली आहे. तसेच या रस्त्यावर अनेक लहान -मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असून अपघातांचे प्रकारही घडत आहेत. सदर विषयाच्या अनुषंगाने ॲड. चोरगे व सहकाऱ्यांनी उप अभियंता श्री खैरमोडे यांची भेट घेतली व त्यांच्याकडे तक्रारी अर्जही करण्यात आला परंतु त्यांनी याबाबत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
दि.२८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यानच्या रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने पहाटेच्या वेळी क्रशर सॅंड टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र त्यामुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून अपघातांचे प्रकारही वाढले आहे. रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांनाही या धुळीचा त्रास होत आहे. त्यास श्री. खैरमोडे हेच पूर्णपणे जबाबदार आहेत.
दरम्यान गेल्या दहा वर्षांपासून उप अभियंता खैरमोडे हे सातारा शहरातच कार्यरत आहेत त्यांची अन्यत्र बदली झालेली नाही. त्यामुळे त्यांचे व येथील ठेकेदारांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा आरोपही श्री. चोरगे यांनी निवेदनात केला आहे. तसेच उपअभियंता खैरमोडे हे औंधच्या एका खासगी संस्थेमध्ये पदाधिकारीही असून राजकीय पक्ष, संघटनांशी जवळीक असल्याने ते तेथील सूत्रे पडद्यामागून हाताळत असतात. या पार्श्वभूमीवर निःपक्षपातीपणे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना तातडीने काळ्या यादी टाकणे आवश्यक आहे.
दरम्यान, सदर मागण्यांबाबत पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण व तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गणेश चोरगे यांनी दिला आहे. हे निवेदन देताना त्यांच्यासोबत सामर्थ्य फाउंडेशनचे पदाधिकारी विक्रम फडतरे, रोहित जाधव, रमेश खंडूजोडे आदी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.