सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) – करोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता लढणाऱ्या पोलिसांनी पुन्हा एकदा मानवतेचे दर्शन घडविले. बोरगाव पोलीस ठाण्याच्यावतीने नागठाणे, ता. सातारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून १६८ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.
सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले होते. आरोग्यमंत्री टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः रक्तदान केले. करोनाच्या संकटात कर्तव्य बजावत आहोतच, पण त्याचबरोबर या संकटात काही तरी आणखी मदत करता येईल का, असा विचार बोरगाव पोलिसांच्या मनात आला. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील व सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली नागठाणे येथे शनिवारी हे शिबीर घेण्यात आले.
यावेळी पोलिस, त्यांचे कुटुंबीय तसेच पोलीस मित्रांनी या शिबिरात रक्तदान केले. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी यांनी देखील या शिबिराला उपस्थिती लावली. यावेळी आंचल दलाल व बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले.
You must be logged in to post a comment.