महाराष्ट्रातील थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं; उदयनराजेंचा घणाघात

भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवलं? आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा सवाल

नागठाणे,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधीच्या आयकर नोटीसा बजावल्या,तेव्हा महाराष्ट्रातील थोर नेते सत्तेवर होते. आयकराच्या बोजातून त्यांनी कारखान्यांना का बाहेर काढले नाही? ही जनता वाडगं घेऊन आपल्या मागे मागे फिरली पाहिजे अशी त्यांची भावना होती. आधी अडचणीत आणायचं आणि उपकार करण्याचा आव आणण्याची त्यांची जुनी पद्धत आहे, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ नागठाणे आणि वर्णे जिल्हा परिषद गटाचा एकत्रीत कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मनोज घोरपडे, राष्ट्रवादी सेवादलाचे राजेंद्र लवंगारे , माजी सभापती सुनील काटकर,वसंतराव जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले,अनिल साळुंखे,आनंदराव नलावडे, श्रीरंग गोरे,अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, लालासाहेब पवार, नंदकुमार नलावडे, शंकर साळुंखे, संजय मोहिते, रामभाऊ जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव, हरिभाऊ साळुंखे, माधवराव गुरव , पृथ्वीराज निकम , विश्रांतीताई साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजे पुढे म्हणाले, काही नेत्यांना आपल्याबरोबरच्या लोकांना अवलंबून ठेवायचे सवय असते. आपल्या सोबत असणाऱ्यांचं ते नुकसानच करतात. स्वर्गीय आमदार अभयसिंहराजे भोसले, विलासकाका पाटील उंडाळकर ही कर्तबगार मंडळी होती पण त्यांच्या योगदानाची कदर केली गेली नाही. अभयसिंह महाराज सोबत उभे राहिले तरी त्यांना अपमानास्पदरीत्या बाजूला करण्यात आले. युज अँड थ्रो अशी संबंधित नेत्यांची जुनीच रीत आहे.

या प्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, भाजप विरोधी असलेले नेते धादांत खोटं बोलून लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा बहुजनांचा पक्ष नाही अशी टीका केली जाते. परंतु आम्ही सर्वजण नेते हे बहुजन समाजातील शेतकरीच आहोत. भारतीय जनता पार्टीने सातारा, जावळी विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोट्यावधीचा निधी देऊन विकास कामे केली आहेत. त्यामुळे भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांनी बदलावा. तो अधिक व्यापक करावा. देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येणार आहेत .त्यामुळे प्रवाहात राहून काम करायला हवे. खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे.

धैर्यशील कदम म्हणाले, भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण राज्यात सत्तांतर झाल्यावर उद्धव ठाकरे सरकारने मिळालेला आरक्षण घालवलं होतं. आता एकनाथ शिंदे सरकारने टिकाऊ असे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे.

मनोज घोरपडे म्हणाले देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने पक्षासाठी वेळ देणे गरजेचे आहे. विकसित भारताचा पाया पाच वर्षात रचला जाणार आहे. येणाऱ्या काळात सगळ्यांचे सोनं होण्यासाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.

भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवलं?

भाऊसाहेब महाराज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असते, परंतु नेत्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पुढे राज्य सरकार स्थापन झाले. परंतु भाऊसाहेब महाराजांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं गेलं. जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांना देण्यात आलं नाही. असं का केलं गेलं याचे उत्तर संबंधित नेत्यांनी द्यावं, असं आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

यावेळी दोन्ही गटातील जेष्ठ पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, गटातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायट्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ, माता- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मेळाव्यात दोन्ही गटातून उदयनराजे यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

error: Content is protected !!