सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाडशोजारील माणगाव गोरेगाव येथील भाविकांच्या खासगी बसला आग लागून बस खाक झाली. सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले. रविवारी (दि.२०) दुपारी तीनच्या सुमारास वाईच्या पसरणी घाटात ही घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
महाड शेजारील माणगाव गोरेगाव येथील 3५ भाविकांनी एकत्रित येऊन महाड येथील खासगी बसमधून (एमएच ०६ एस ९३५४) पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनासाठी शुक्रवारी गेले होते. तेथून ते देवदर्शन उरकून रविवारी (दि.२०) वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाईच्या दर्शनसाठी दुपारी पोचले. तेथील देवदर्शनाचा कार्यक्रम उरकुन पुन्हा भाविक दुपारी तीनच्या सुमारास मांढरदेवहून वाई पसरणी घाटातून महाडकडे जात असताना त्यांची दत्त मंदिराजवळ बस आली असता अचानक बसच्या इंजिनमधून धुराचे लोट येऊ लागले.
चालक रविंद्र पोळसकर यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी करुन बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. वाई आणि पाचगणी पोलिसांनी प्रथम अग्निशामक यंत्रणेच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. परंतु, दुर्दैवाने बस जळूनखाक झाली.
You must be logged in to post a comment.