सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वर-वाई रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने प्रवासी बस पलटी झाली. या भीषण अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, चाकण, पुणे येथील एका कंपनीची वार्षिक सहल महाबळेश्वर परिसरात आली होती. आज ते सर्व जण प्रतापगडहून पुण्याच्या दिशेने चालले होते. या बसमध्ये ३४ प्रवासी होते. पसरणी, ता. वाई घाटामध्ये असताना अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस बुवासाहेब मंदिराच्या पालखी रस्त्याजवळ पलटी झाली. यात १५ जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात झाल्यानंतर इतर लोकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे रस्तावरील वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाई पोलिसांनी रस्ता मोकळा करून दिल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती
You must be logged in to post a comment.