खा.उदयनराजेंसह महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या तोफा धडाडणार

आ.शिवेंद्रराजेंसाठी गांधी मैदानावर रविवारी प्रचाराचा एल्गार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. १७ रोजी सायंकाळी पाच वाजता साताऱ्यात राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर विराट प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगता सभेत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह महायुतीतील प्रमुख मान्यवरांच्या तोफा धडाडणार आहेत.

रविवारच्या या विराट सभेला मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींनी आणि जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले असून या सभेच्या नियोजनार्थ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुची निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे लोकसभा संयोजक व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, विधानसभा संयोजक व माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्यासह सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, भाजप आणि महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, परळी, शेंद्रे, कोंडवे आणि लिंब जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

रविवारच्या सभेला खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, आरपीआयसह महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजपचे सर्व आजी- माजी पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, परळी, शेंद्रे, लिंब, कोंडवे जिल्हा परिषद गटातील सर्व आजी- माजी पदाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, अजिंक्य उद्योग समूहातील सर्व संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक यांच्यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

या सभेला सातारा शहरासह मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनी तसेच दोन्ही राजेंवर प्रेम करणाऱ्या जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!