सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते यांना शासनाकडून देण्यात आलेली चारचाकी त्यांच्या निवासस्थानच्या खाली असलेल्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सातारा-कोरेगाव रस्त्यावर शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. एकाच परिसरात ‘तक्षशिला’ आणि ‘नालंदा’ ही दोन अपार्टमेंट असून येथे वर्ग एकच्या दर्जाचे अधिकारी राहतात. ‘नालंदा’मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते राहतात. त्यांना प्रशासनाने सुमो गाडी (एमएच ११ – एबी १६६) दिली असून त्या गाडीवर पुढे ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहले आहे. या गाडीवर चंद्रकांत हिंदूराव पवार (रा. पवाराची निगडी, ता. सातारा) हे चालक आहेत. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी सुमो गाडी ‘नालंदा’ अपार्टमेंटच्या खाली असणाऱ्या पार्किंगमध्ये लावली आणि ते घरी गेले. मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ते ‘नालंदा’मध्ये आले असता त्यांना पार्क केलेल्या ठिकाणी गाडी दिसून आली नाही. याबाबतची तक्रार चालक चंद्रकांत पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.