केंजळ पुतळा प्रकरणी ३६ युवकांवर गुन्हा दाखल, आठ जण ताब्यात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंजळ (ता. वाई) येथे विनापरवाना बसविलेला छत्रपतीं शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री स्थानिक प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला. सदर पुतळा सुरक्षितरीत्या सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी ३६ जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

केंजल येथे शुक्रवारी ११ रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या चौकात भैरवनाथ मंदिरालगत चबुतरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित केला. याबाबतची माहिती पोलीस व महसूल प्रशासनास मिळाली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक गणेश केंद्रे, तानाजी बुरडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे आदी अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गावातील ज्येष्ठ नागरीक व पदाधिकारी यांची बैठक घेतली. ज्यांनी पुतळा बसविला आहे, त्यांनी तो काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तसेच शासनाची परवानगी घेऊन पुन्हा सार्वजनिक ठिकाणी बसवावा, अशी सूचना केली. त्यावर काही ग्रामस्थ व युवकांनी पुतळा काढून घेण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते.


त्यानंतर दिवसभर ग्रामस्थ व युवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. कोणीही ऐकत नसल्याचे दिसून आल्या नंतर पोलिस कर्मचाऱ्यांची ज्यादा कुमुक मागविण्यात आली. सामोपचाराने मार्ग निघत नसल्याने पोलिसांनी ग्रामपंचायत चौकातून गावकऱ्यांना हटविले. त्यानंतर पोलिसांनी पुतळा हटविण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा जेसिबी, ब्रेकरच्या साहाय्याने चबुतरा दूर करून पुतळा सुरक्षित काढण्यात आला. नंतर पुतळा सुरक्षितरीत्या सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयात नेण्यात आला. रविवारी सकाळी गावात पोलिसांनी संचलन केले. दिवसभर गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भुईंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!