माकडाला केळी खाऊ घालणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये यवतेश्वर घाटात कारवाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): वन्यप्राण्यांना खाद्यपदार्थ खाऊ घालणे हा कायद्यान्वये गुन्हा ठरतो, याचे प्रत्यंतर यवतेश्वर घाटात आले आहे. शनिवारी १६ ऑगस्ट रोजी माकडाला केळी खाऊ घातल्याप्रकरणी शिवाजी नानासो देशमुख (रा. वेळेकामथी ता. सातारा) यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित आरोपीचा जबाब नोंदवून त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

सदर कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, वनपाल सुनील शिंदे, वनरक्षक मुकेश राऊळकर व इतर वनमजुरांनी केली.

वन विभागाने आवाहन केले आहे की, कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही वन्यप्राण्याला छेडणे, त्रास देणे, जखमी करणे किंवा खाद्यपदार्थ खाऊ घालणे कायद्यानं गुन्हा आहे. असे कृत्य कोणीही करू नये, केल्यास संबंधितावर तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

का गुन्हा आहे?

अनेक पर्यटनस्थळी माकडांच्या झुंडी पर्यटकांना दिपवतात. सुरुवातीला निरागस पर्यटक त्यांना खाऊ घालताना दिसतात. वरवर पाहता यात काही गैर नाही, पण याचे दूरगामी दुष्परिणाम गंभीर आहेत. अशा सततच्या खाऊपायी माकडांची निसर्गाने दिलेली खाद्यशोधण्याची क्षमता कमी होत जाते आणि ती पूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून होऊ लागतात. खाद्य न मिळाल्यास हीच माकडे धीट बनून पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ किंवा अन्य वस्तू हिसकावतात, प्रसंगी हल्ल्यापर्यंत मजल मारतात. पर्यटकांच्या चीजवस्तू पळवून नेल्याच्या घटनाही वारंवार समोर आल्या आहेत. एवढेच नव्हे, तर माकडांना खाऊ घालण्याच्या प्रयत्नात पर्यटकांनी स्वतःचाच जीव धोक्यात घातल्याची उदाहरणे आहेत. मुळात, पाळीव नसलेल्या प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देणे माणसांसाठीच कटकटीचे ठरते. यामुळेच वन्यजीव संरक्षण अधिनियमात अशा कृत्यावर बंदी घालणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!