सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साधे पद्धतीने साजरा

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील प. पू. श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव यात्रेतील धार्मिक विधी रूढी व परंपरेनुसार करून, साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

पारंपरिक धार्मिक विधी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, पुजारी व विश्वस्तांनी पार पाडले. त्यानंतर श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका रथात ठेवण्यात आल्या. पुण्यतिथी निमित्त सकाळी 11 वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रथ पूजन करण्यात आले. या रथ सोहळ्याला आमदार महेश शिंदे,आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नागरिकांनी सोशल डिस्टसिंग पाळत रथातील श्री सेवागिरी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यात्रेला गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, रथ व समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. परवानगीशिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. पुसेगाव शहर व मंदिराकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेडस्‌ लावून बंद करण्यात आले होते. परगावातील कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला गेला नाही. गावातील नागरिकांनाही रस्त्यावर फिरकू दिले नाही.

मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांनी आपापल्या घरी श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची पूजा, आरती व मनोभावे स्मरण करून फेसबुक लाइव्ह व यूट्यूबच्या माध्यमातून सुवर्णमंडित समाधी व रथाच्या लाइव्ह दर्शनाचा आनंद लुटला.

error: Content is protected !!