सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): विकास कामे न करताही मोठा गाजावाजा करणारे सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपला वाढदिवस मात्र जय्यत तयारीने करतांना पाहायला भेटतात.आज एका नेत्याचा वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी व जाहिरातबाजी काही ठेकेदारांनी केली आहे. त्याच शेजारी असलेली वास्तवता जनतेसमोर आणण्यासाठी सातारा येथील जुन्या खेड हद्दीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते प्रतिक गायकवाड व शिवांजली , कोयना सोसायटीच्या रहिवाशांच्यावतीने रस्त्यात पडलेल्या खड्डयाचा उपहासात्मक ‘खड्डे का बर्थडे’ साजरा केला.
हा बर्थडे साजरा करताना केक कापण्यात आला तसेच या खड्ड्याला शाल गुंडाळली. खेड भागातील लोक व शेतकऱ्यांना सातारा शहरात येण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. रस्त्याच्या दुतर्फा खड्डे पडलेले आहेत.त्यापैकी सातारा नगर पालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डयात प्रतीकात्मक आंदोलन प्रतिक गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.तसाच या ठिकाणी आंदोलकांनी बिर्याणी भोजनाचाही आस्वाद घेतला .
लोकप्रतिनिधींनी या रस्त्याबाबत काळजी घेणे अपेक्षित असताना दुर्लक्ष केल्यामुळे हे निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.यावेळी स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत आजूबाजूच्या परिसरात झाडं झुडपं वाढलेले आहेत. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. मोठ्या प्रमाणात डास,मच्छर झाल्यामुळे रोगराई पसरलेली आहे. या सर्व गोष्टीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
खेड महामार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत त्याच्या शेजारीच बॅनरबाजी व जाहिरातबाजी होत असल्याने लोकांचे लक्ष बॅनरबाजी पेक्षाही खड्डयाकडे जास्त जात आहे .त्यामुळे आजच्या आंदोलनामुळे ज्यांचा या खड्डयाची संबंध आहे अशा लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी रहिवाशांनी केलेली आहे.
राजकीय नेत्याला लाजवेल अशा पद्धतीने फटाक्याची आतिषबाजी, घोषणाबाजी करत त्याठिकाणी केक कापून सदर खड्ड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
दरम्यान,या रस्त्याची डागडुजी केल्यास मोठ्या प्रमाणात संबंधित लोकप्रतिनिधीचा सत्कार करण्यात येईल असेही आंदोलकांनी स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.